पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू गात माझ्या झाडावर उतरतं.
चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि `गोष्ट सांग’ म्हणून चिवचिवाट करतात….हे सगळं किती लोभसवाणं आहे ! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कांजमा होतंय ? `आहे मनोहर तरी गमते उदास ‘ अशी ही मनाची अवस्था असताना या
पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू ?
एक होता राजा आणि एक होती..
(एक कोण होती ?)
… आणि एक होती परी की एक होती म्हातारी ?की…
(दुसरं कुणी नव्हतंच ?) फक्त…
एक होती परी आणि ती झाली म्हातारी ?……..
सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी.सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.
सध्या असा एक मूड आहे की ज्याला `आताशा मी नसतेंच इथे’ मूड म्हणता येईल.म्हणजे कुणाला भेटू नये, कुणी येऊन डिस्टर्ब करू नये, एकटेच बसावे, स्वतःतच राहावे,असा. पडून किंवा बसून राहावे.- डोळे उघडे किंवा मिटलेले, कसेही. पण सभोवारचे काहीच न पाहता, त्यात अगर या इथे न राहता. सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळखेळत, त्याच जगाशी एकरूप होत, तिथली सुखदुःखे भोगत.अशा वेळी डोळ्यांना दुसरचं जग दिसत राहतं. कानांची स्थिती Sir Thomas Browneच्या शब्दांतल्या नाईल नदीसारखी होते.`and Nilus heareth strange voices’ अशी. धूसर स्वप्नं पडत राहतात, विरत राहतात. `मी झालेंय निळं गाणं- निळ्या नदीत वाहणारं- निर्मात्याबरोबरच’ ती हीच अवस्था का ? पद््माबाईना विचारायला हवं.
आयुष्याच्या सुरूवातीला, जिथून आयुष्य फुलायला लागते अशा वळणावर एक, आणि शेवटी शेवटी, म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागले अशा वळणावर एक, असे दोन जबरदस्त मित्र मला लाभले. दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे,प्रवृत्तीचे. मीही तीच राहिले नव्हते. पार बदलून गेले होते. मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण विसरून, चक्रावून – अगदी पायाला चाके लावून- त्याचा संसार केला. तोही जबरदस्त होता म्हणून मी या बंधनात अडकले की… तो अगदीच मूल होता म्हणून त्याचेच खेळणे





