No Comments

गुढीपाडवा

मराठी वर्षाचा पहिला दिवस – चैत्र शुद्ध प्रतिपदा – हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारून, दाराला तोरण बांधून, गारवा देणार्‍या, औषधी असणार्‍या कडुनिंबाची कोवळी पाने गुढीसोबत बांधून गुढीची पूजा केली जाते. नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ, नवे कोरे कापड (साडी इत्यादी), आणि गडू-तांब्या असे त्यावर बांधून सूर्योदयाला ही बांबूची काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. सूर्यास्ताला पुन्हा पूजा करुन ती उतरवतात.

नवीन वर्षाचा हा दिवस उन्हाळ्याच्या सुरुवातीचा असल्याने औषधी असा कोवळा कडूनिंब, मीठ, सैंधव, जिरे, मीरे, ओवा एकत्र वाटून थोडेसे खाण्याची प्रथा आहे. नवे निश्र्चय, चांगल्या सवयींची सुरुवात करून हा दिवस साजरा करतात. पूर्ण वर्ष उत्साहात जावे यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा समजला जातो.

सर्वरोगपरिहारक असा कडुनिंब वृक्ष असल्याचे आर्यभिषक या प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. जंतुनाशक अशा कडुनिंबाचे महत्त्व शास्त्रीय संशोधनानेही सिद्ध केले आहे. कमी पाण्यावर राहून दहा वर्षात वाढणारी ही झाडे हवा शुद्ध राखण्यासाठी महत्त्वाची आहेत. बी, साल, पाने असे पूर्ण झाड त्याच्या औषधी गुणांमुळे महत्त्वाचे आहे. वर्षातील पहिल्या दिवशी या महत्त्वाच्या झाडाची आठवण सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने करून दिली आहे.

रामायणात उल्लेख आहे त्यानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्यादिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला. म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असे म्हटले जाते. चांगली वेळ म्हणजे मुहूर्त. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त समजला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) वसंत ऋतूची सुरुवात होते. सृष्टीला नवजीवन देणारा हा ऋतू आहे. आपल्या वर्षाची गणना करताना पहिला उत्तम दिवस असेही या दिवसाला म्हटले आहे. ‘प्रतिपदा’ या शब्दाचा अपभ्रंश पाडवा झाला असावा. गुढीमध्ये वापरलेल्या प्रतिकांचा विशेष उल्लेख करायला हवा. बांबूला अनेक वेळा नवे बांबू तयार करण्याची निसर्गाने शक्ती दिली आहे, तरीही तो लवचीक असतो त्याप्रमाणे आपल्यात ताकद यावी. वस्त्र, खण हे मंगलमय वातावरण आणते, काठीवर किंवा बांबूवर धातूचा गडू किंवा तांब्या पालथा असतो. या धातूमुळे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाने येणार्‍या प्रकाशलहरी खेचून घेण्याची शक्यता वाढते असे म्हणतात.

You might also like
Tags: festival, maharashtra, marathi

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.