No Comments

जीवन त्यांना कळलें हो

‘मी एस्एम् ‘ ही एस. एम. जोशी यांची आत्मकथा आहे. यंदा 12 नोव्हेंबरला त्यांच्या वयाला 80 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांच्या मित्रांनी त्यांना आपल्या जीवनाची कहाणी सांगायला लावले आहे. त्यांनी ती टेपरेकॉर्डला सांगितली आणि आता ती ग्रंथरूपाने वाचकांच्या पुढे येत आहे.

अकृत्रिमता हे एसेमच्या स्वभावाचे सर्वांत मोठे वेशिष्टय आहे आणि त्यांची कथाही त्यांच्या स्वभावासारख्याच कमालीच्या सहजभावाने प्रकटली आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच त्यांनी म्हटलेय की "माझ्यातला `मी’ कधी जन्माला आला असे जर कोणी विचारले तर ते सांगणे फार कठीण आहे." मला तर हे वाक्य वाचताना वाटले की ते कठीण नाही, तर अशक्य आहे. त्यांच्या जीवनाला `मी’ पणाचा स्पर्शच झाला नाही. बोरकरांची एक कविता आहे : ` जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणानें गळलें हो. ‘ इतके ` मी ‘ पण गळलेली आणखी दोनच माणसे मला पाहायला मिळाली : एक सेनापती बापट आणि दुसरे सानेगुरूजी. आपली काया, वाचा आणि मन समाजपुरूषाला अर्पण केलेल्या एसेमना पेशाची श्रीमंती मिरवण्याची कधी संधीच लाभली नाही. पण सर्वसंगपरित्याग करूनही त्या त्यागाच्या दिंडयांपताकाही कधी खांद्यावर मिरवल्या नाहीत. पुष्कळदा साधेपणाही फार चतुराईने मिरवला जातो. गांधीवर त्यांची परमश्रध्दा असूनही त्यांना पंचा नेसून हिंडावे असे कधी वाटले नाही. त्याबरोबर परीटघडीतले बिनसुरकुतीचे गोंडसपणही मानवले नाही. पर्वतीच्या हरिजन मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहात सनातनी धर्मरक्षकांनी त्यांचे खादीचे धोतर खेचून लज्जारक्षण अवघड केले. तेव्हापासून त्यांनी नाडीचा लेंगा वापरायला सुरूवात केल्याची कथा त्यांनी ह्या पुस्तकात सांगितली आहे. हा त्यांचा वेश मी गेली बावन्न – त्रेपन्न वर्षे पाहतोय. अर्थात मी एसेमना प्रथम केव्हा पाहिले ह्या घटनेला काडीचेही सार्वजनिक महत्व नसले तरी माझ्या मनात मात्र त्यांच्या त्या पहिल्या दर्शनाचे चित्र आजही, त्या घटनेला अर्धशतक लोटून गेले तरी ताजे आहे.

एकोणीसशे एकतीसच्या म. गांधीच्या सत्याग्रहाची छावणी पार्ल्यात होती. आज त्या जागी सिगारेट बनवायचा कारखाना आहे. एकतीस साली भारतातील सर्व लहानसहान देशभक्तांची ती काशी होती. चळवळीच्या त्या वातावरणात पार्ल्यात घरोघरी चरखे किंवा टकळ्या फिरत होत्या, प्रभातफेऱ्या निघत होत्या, तुरूंगात जायला सत्याग्रही सिद््ध होत होते. आम्हा शाळकरी मुलांसाठी वानरसेनाही निघाली होती. जरीच्या किंवा वेलबुट्टीच्या टोप्या जाऊन डोक्यावर गांधी टोप्या चढल्या होत्या. छावणीत येणाऱ्या थोर देशभक्तांची पार्ल्याच्या टिळकमंदिरात व्याख्याने व्हायची. त्यांच्या सभांना जायला आम्हांला घरातूनही उत्तेजन होते आणि शाळेतूनही होते.

अशा ह्या भारून गेल्यासारख्या वातावरणाच्या काळात एका रविवारी सकाळी टिळकमंदिरात एसेम जोशी नावाचा पुण्यातला तरूण देशभक्त भाषण करणार असल्याचे कळले. कॉग्रेसमधल्या तरूणांनी युथ लीग नावाची तरूण देशभक्तांची संघटना स्थापन केल्याची कुणकुण कानांवर आली होती. युथ आणि लीग ह्या दोन्हीं शब्दांचे स्पेलिंगदेखील नक्की ठाऊक नव्हते, पण व्याख्यान म्हणून चुकवायचे नाही हा पार्ल्यातल्या पोराथोरांचा बाणा असल्यामुळे त्या वेळच्या टिळकमंदिराच्या त्या छोटयाशा सभागृहात लवकर जाऊन जागा धरून बसलो आणि आमच्या पार्ल्यातलेच चिकेरूर नावाचे तरूण देशभक्त एसेमना घेऊन आत आले. ह्या गोऱ्यापान चेहऱ्याच्या, सडपातळ बांध्याच्या, पांढराशुभ्र खादीचा पायजमा, ओपन कॉलरचा पांढरा शर्ट आणि घोंगडीसारख्या जाड खादीच्या कापडाचा कोट घालून आलेल्या तरूणाच्या नुसत्या देखणेपणानेच आम्ही मुग्ध होऊन गेलो. सभेला मराठी लोकांइतकेच गुजरातीही श्रोते होते, त्यामुळे असावे, पण एसेम त्या दिवशी हिंदीत बोलले

पुढे वाचा

You might also like
Tags: featured, marathi sahitya, pula, pula deshpande

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.