रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्याचे, नारळ-फणसांचे,खाजर्या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणार्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शितातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायु नि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायु मिसळला आहे ते त्या रत्नांग्रीच्या विश्र्वेश्र्वरालाच ठाऊक.
अंतू बरवा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बरव्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी बाराचौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे ‘पडणे’ हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहर्याचा
“‘अण्णू’ झाला काय रे?” म्हणून अंतू ओरडतो.
समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही. परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना, कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन ‘अंतूशेट’ हे आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पाप घडले होते. पहिल्या महायुध्दाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते. ते केव्हाच बुडाले. परंतु ‘अंतूशेट’व्हायला ते कारण पुरेसे होते. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. दोन वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळीची पाचपंचवीस, पोफळीची दहापंधरा आणि रातांबीची काही अशी झाडे आहेत. दोनपाच हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, चिंच उभी आहे. वाडवडिलार्जीत घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली आली आहे. विहीरीवर वहिवाटीचा हक्क आहे. ह्या सगळ्या आधारावर अंतूशेट उभे आहेत.
त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि ‘केसरी’च्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतूशेटनी तडक प्रश्न केला होता, ”
“वकीलसाहेबांचे जावई ना ?”
“हो!”
“झटक्यात ओळखलेंच मी! बसा! बापू, जावयबापूंना चहा मागवा”


