आजवर कुठल्याही शींप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटुनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सुट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा !
पुढे वाचा
No Comments