नाथा कामत हे प्राणिमात्र माझ्या जीवनात का म्हणून आले आहे आणि दातांत काहीतरी अडकावे तसे का अडकून राहिले आहे, माझ्या मनात त्याच्याविषयी निश्र्चितपणाने कोणत्या भावना आहेत, याचा अजून माझा मलाच नीट उलगडा झालेला नाही या जन्मात होणार नाही.
“बाबा रे ! तुझं जग निराळं आणि माझं निराळं!” नाथा कामत कुळकर्ण्याच्या हॉटेलात हातातले भजे दोन्ही बाजूंनी राणीछाप रुपया निरखून पाहावा तसे उलटून पालटून पाहत मला अनेक वेळा हताश होत्साता सांगत होता. त्याच्या ह्या अशा वागण्यातल्या दोन गोष्टी मला आवडत नाहीत. एक म्हणजे खाण्याचा पदार्थ निरखून पाहत खाणे. नाथा कामताला ही फार वाईट खोड आहे. अर्थात आपले सर्व उसासे, निःश्र्वास इ० माझ्यावर सोडण्यासाठी मला तो होऊन हॉटेलात घेऊन जात असल्यामुळे त्याने भजेच काय पण बटाटेपोह्यांतला प्रत्येक पोहा आणि मातीत सोने सापडावे तस्स दुर्मीळ मार्गाने सापडणारा बटाट्याचा एक-सहस्त्रांश तुकडा जरी निरखून पाहिला तरी मला त्याबद्दल तोंड उघडता येत नाही. पण दुसरी न आवडणारी गोष्ट मात्र तापदायक आहे. मला कुणी ‘बाबा’ शब्दाचे ‘हे बाबा’. ‘भो बाबा’ किंवा ‘बाबा रे’ हे संबोधन वापरले की चीड येते. ‘बाबा रे’ ह्या शब्दाने वाक्याची सुरूवात करणारी माणसे ऎकणाराला एकदम खालच्या पातळीवर आणून बसवतात. ‘बाबा रे’ ह्या शब्दापुढे “वत्सा, तू अजाण आहेस.”. “बेटा, दुनिया काय आहे हे तू पहिचानलं नाहीस”, “हा भवसागर दुस्तर आहे.”, “प्राण्या, रामकथारस पी” अशांसारखी अनेक वाक्ये गुप्तपणाने वावरत असतात.
नाथा कामताच्या वाक्यातला ‘बाबा रे’ हा एवढा तिरस्कारणीय अतएव त्याज्य जातीचा शब्द सोडला तर `त्याचं जग निराळं आणि माझं जग निराळं’ ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. मी राष्ट्रभाषेत `गौ आदमी’ किंवा अलाघरची गाय होतो. (“शुद्ध बैलोबा आहे” हे माझ्याविषयीचे ज्येष्ठ नातलगांतली चालू मत चिंत्य आहे.) मी अल्लाघरची गाय होतो आणि नाथा कामत हा– अलाघरी असतात की नाही मला ठाऊक नाही, पण–अलाघरचा मोर होता. सदैव आपला पिसारा फुलवून नित्यनुतन लांडोरीच्या शोधात. त्यला घडवताना विधात्याने रोमियो, मजनू, फरहाद, हिररांझा ह्या पंजाबी नरमादीपैकी जो कोणी नर असेल तो, सोणीमहीवालमधला वाल किंवा महीवाल आणि क्लिंओपात्रा ते कान्होपात्रा ह्या व अशांसारख्या हजारो सुंदरींवर जीव ओवाळीत राहणे एवढेच कार्य केलेले जे जे म्हणून परदेशी व एतद्देशीय गडी होऊन गेले त्यांचे नकाशे संबंधित अधिका-यांकडून मागवले असतील आणि त्यानंतर नाथा कामत नावाचा पदार्थ तो विधाता करिता होऊन चार महिन्यांच्या शेपशयनी जाता झाला असेल.
कुठल्याही शहरवस्तीतल्या रस्त्यातून नाथा कामताबरोबर चालत जाण्यापेक्षा गोवीच्या वाळवंटातून भर दुपारी अनवाणी धावत जाणे अधिक सुखावह! पातळ, लुगडे किंवा स्कर्ट गुंडाळून द्र्ष्टिपथातून काहीही सरकल्यासारखे झाले की नाथा कामताचे पंचप्राण डोळ्यांत येऊन गोठतात, गळ्यातले आदामचे सफरचंद सुतार लोकांकडे लेव्हल मोजायचे यंत्र असते त्यातल्या बुडबुड्यासारखे खालीवर व्हायला लागते, मानेचा कोन उलटा फिरत तीनशेसाठ अंशांचा प्रवास करून येतो. आणि वस्त्रन्वित वस्तू जरा देखण्यातली निघाली की नाथाच्या बुटाला चाके लावल्यासारखा तो अधांतरी तरंगू लागतो. ह्या तुर्यावस्थेतून सहजभावात यायला काही मिनिटे जावे लागतात. मग आपल्या त्या टायने आवळलेल्या गळ्यातून `गटळळगर्रगम’ अशांसारख्या अक्षरांनी वर्णन करता येण्यासारख्या आवाज काढून तो भानावर येतो.
नाथाची आणि माझी मैत्री ही एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी तशी झाली. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी सारख्या नाहीत. माझे कपडे शिवणारा शिंपी तंबोऱ्याच्या गवसण्या, तबल्याच्या खोळी, उशांचे अभ्रे वगैरे शिवून उरलेल्या वेळात सद्रे, कोट वगैरे माणसे झाकायची कापडे शिवणारा; तर नाथाचा कोट कोटात शिवला जातो, पॅंट भायखळ्याला आणि शर्ट सॅंडहर्स्ट रोडवरच्या स्पेशलिस्टाकडे! त्याला मेट्रोला कुठले पिक्चर आहे, एलिझाबेथ टेलरची सध्या प्रकृती कशी आहे, रिटा हेवर्थ अधिक दाहक की जिना लोलिब्रिजीडा, ब्रिजित बार्दोची मापे, वगैरे गोष्टींचा लळा तर मी गावातल्या गावात व्यंकटेश टॉकिजमध्ये ‘भक्त सुदामा’ पाहणाऱ्यांपैकी! त्याच्या माझ्या वयांत खूप फरक आहे. तो आणि मी एका कचेरीत नोकरीला नाही तरीदेखील उभ्या गावाला आमच्या मैत्रीची माहिती आहे. गावकरी मंडळीना वास्तविक हे अजब वाटते. नाथा एरवी गावात फारसा मिसळणाऱ्यांतला नाही. तो देहाने पार्ल्यात असला तरी मनाने चौपाटीवर नाहीतर रेक्लेमेशनवर असतो. कारणपरत्वे हिंदू कॉलनीच्या गल्ल्यांत अथवा शिवाजी पार्कवर आढळतो. गिरगाव रस्त्याला खोताची वाडी जिथे ‘टांग जराशी’ मारते त्या नाक्यावर शनिवारी पाच ते साडेसहा ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी लावावी तसा उभा असतो.
त्याचा थोरला भाऊ गणपती आणि मी एका वर्गातले. पण नाथा आणि गणपती हे भाऊभाऊ आहेत हे केवळ वडिलांचे नाव आणि आडनाव तेच लावतात म्हणून खरे मानायचे. गणपती मॅट्रिक झाल्यावर महिन्याभरातच पोस्टात चिकटला आणि गेली कित्येक वर्षे लिफाफ्याला स्टांप चिकटून राहावा तसा पोस्टखात्याला चिकटून आहे.




