मित्रांनो, ‘तो’ मीच का ‘तो मी नव्हेच’ अशी शंका प्रेक्षकांनी कृपया घेऊ नये. तो ‘मी’च पु. ल. देशपांडेच आहे. माझे मित्र श्री. वसंतराव कानेटकर यांनी माझी ओळख करुन देताना माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. अत्यंत निकटचे स्नेही असल्यामुळे अशी अतिशयोक्ती होणे स्वाभाविक आहे. मला भीति वाटू लागली होती की, आता हे मी त्यांना अगदी खाजगीत सांगितलेल्या गोष्टी अशा उघड्यावर बोलतात की काय? आणि त्यांनी तसे केले असते तर मी त्यांच्याच एखाद्या सुंदर नाटकाचा विषय घेऊन त्यावर बोलण्याचे ठरविले होते. वास्तविक “कानेटकरांचे सुंदर नाटक” असे म्हणण्यात द्विरूक्ती झाली आहे; कारण कानेटकरांचे प्रत्येकच नाटक सुंदर असते. परंतु कानेटकरांनी तेवढा संयम राखला आणि मला ती संधी दिली नाही.
आताच प्राचार्यांकडून मला असे सुचविण्यात आले की, मी काही मार्गदर्शनपर गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना उपदेश करावा. वास्तविक माझा असा उपदेश करण्यावर आणि तो उपदेश लोक ऐकत असतील या दोन्हींवर विश्वास नाही.प्रथम ह्या प्रसंगी ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत आणि ज्यांनी त्यांना ती मिळू दिली अशा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः स्वतःचे जीव धोक्यात घालून इतरांचा बचाव करण्यात श्री. तिजारे व श्री. शिंदे यांनी दाखविलेल्या सहजस्फ़ूर्त धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तुमच्या ह्या नाशिक शहराला एक विशेष परंपरा आहे. ती म्हणजे कधी तरी राम येथे पंचवटीत येऊन राहिला आणि सीतामाईने त्याचे पाय चुरले म्हणून नव्हे किंवा नाशिकच्या चिवड्यासाठीही नव्हे. परवाच मी कोणाला तरी सांगितले की मी नाशिकला जात आहे. त्यांनी “ऑं!” असा उद्गार काढला व अगदी चेहरा पाडला. मी म्हटले तसे काही नाही– स्नेहसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी जात आहे.
नाशिक शहराला सावरकर, कान्हेरे यांच्यासारख्या क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे आणि आजही जशी ह्या आठवणींची ज्योत माझ्या ह्रदयात तेवत आहे तशीच ही आठवण तुमच्याही ह्रदयात सतत तेवत राहील अशी माझी खात्री आहे. असले प्रसंग किरकोळ म्हणून नाउमेद व्हायचे कारण नसते. कल्पना करा की,सूर्य मावळताना त्याला चिंता पडली की,माझा उजेड संपल्यावर या सर्व जगाचे कसे होणार?— सर्व सत्ताधारी व्यक्तींची हीच भीती असते की, माझ्यानंतर या खुर्चीचे काय होणार? सूर्य तरी याला अपवाद कसा? सर्व विद्युद्दीप पेटले होते, मशाली पेटल्या होत्या, अशा वेळी एक बारीकशी पणती—केवढी मिणमिणती ज्योत होती त्या पणतीची !—ती म्हणाली,”भगवन , मला होईल तेवढे मी आपले कार्य करीन. कदाचित आपल्याइतके सामर्थ्य नसेल माझ्या या प्रकाशात. परंतु म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही.” स्वा. सावरकर, कान्हेरे यांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांच्या साहसाइतके तुमच्या तिजारे, शिंदेंचे साहस मोठे नसेल, पण त्यालाही महत्व आहेच. त्यांच्या कर्तव्यतत्पर साहसप्रवृत्तीला महत्त्व आहे.
मी असे ठरविले होते की, काही भाषण तयार करुन जाण्यापेक्षा येथे आल्यावरच तुमच्याशी काही हितगुज करावे. असे भाषण तयार करुन जाण्याचे माझ्यावर अनेकदा प्रसंग येतात आणि येथे तर ते नेहमीच येत असतील. आजचा विद्यार्थीवर्ग बदलला आहे, असा गहजब नेहमी कानांवर पडतो, पण मला तरी हा विद्यार्थीवर्ग बदलला आहे असे वाटत नाही. विद्यार्थ्यांचे बाह्यांग बदलले आहे, पॅंट्सची रूंदी कमी झाली आहे. तरुणींच्या पोषाखाबाबत मी जास्त तपशीलात शिरत नाही. गॅदरींगच्यावेळी एखादा विद्यार्थी बक्षीस घेत असताना ‘वशिला’ करुन ओरडणे…सर्व तेच आहे. मीही तुमच्यासारखा असताना असेच ओरडत होतो, आणि म्हणून मला वाटते, जे लोक असे म्हणतात की, विद्यार्थी बदलले आहेत ते लोक स्वतःची विद्यार्थीदशा पूर्णतया विसरलेले असतात.
मला काही सांगायचंय ह्या कानेटकरांच्या नाटकाच्या नावाचा आधार घेउन मी असे सांगतो की, प्रत्येकाच्या कृतीत ‘मला काही सांगायचंय’ ही भावना असते. आणि ऐकू इच्छिणाऱ्या समोरील व्यक्तिमध्येही त्याचा अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा असते. बस पकडण्यासाठी काय माणसे धावत नाहीत ? परंतु त्या धावण्यामागे आणि आताच्या या ‘रनिंग’च्या स्पर्धकांच्या धावण्यामागे काही निराळा दृष्टीकोण असतो. त्यामधून त्याला काही सांगायचे असते. त्याचप्रमाणे रांगोळीस्पर्धा. त्या स्पर्धकांना माहीत असते की, रांगोळी फार तर उद्यापर्यंत राहील आणि परवा हा दिवाणखाना झाडणारा नोकर ती रंगोळी, ती कलाकृती झाडून टाकणार आहे. आणि हे माहीत असूनही ते कलावंत पाच पाच, सहा सहा तास खपून ती रांगोळी काढीतच असतात.कारण त्या कलाकृतीतून त्यांना काहीतरी सांगायचे असते. परंतु ते सांगणेसुद्धा सुंदर व आकर्षक असावे लागते. उदारणार्थ, एखाद्या मुलीचे लग्न ठरले—मुलीचे येथे नाव मुद्दामच घेत नाही, नाहीतर उद्यापासून तिचा कॉलेजमध्ये छळ सुरु व्हायचा. म्हणूनच मी ‘क्ष’ असे म्हणतो. आणि क्ष वगैरे म्हटल्याने आपण विद्वान असल्याचा आनंद होतो—तर समजा, त्या मुलीचे लग्न ठरले, तर लागलीच तिची आई पहिल्या शेजारणीला सांगते,”अहो ऐकलं का ?” ती एकदम सांगत नाही, आमच्या मुलीचे लग्न ठरले म्हणून ! “अहो ऐकलं का ?” की त्यावर ती शेजारीण म्हणते,”का हो,काय झालं ?” ती आई मग सांगते ,” बरं का ! आमच्या ‘क्ष’चं लग्न ठरलं ! आणि अगदी अचानक , अकल्पितच ठरत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी चूक अत्यंत आनंदात साजरी होत असते आणि ह्या सर्व गोष्टी सारे जण रस घेऊन ऐकत असतात.
साहित्य-संगीत-कला या सर्वांच्या मुळाशी ‘मला काही सांगायचयं’ हीच भावना आहे. उक्तीने व कृतीने आपले म्हणणे सांगण्याची ऊर्मी तुम्हा-आम्हा सर्वांत आहे. सूर्योदय आपण कधी नव्हे तो चुकून एखाद्या वेळी पाहिला असला तरी सूर्योदयाचे चित्र आपण आनंदाने पाहतोच. म्हणजेच या सांगण्यामध्ये आनंद असावा. नाहीतर एखाद्या विद्यार्थ्याला “का रे झाला का बक्षीसमारंभ ? किती बक्षीसे वाटली ?” असे विचारल्यावर त्याने ” वाटले पन्नाससाठ कप ” असे उत्तर दिल्यास विचारणाऱ्याला पुढे हिंमतच व्हायची नाही. पण तेच जर “वा ! केवढी गर्दी झाली होती पु. लं. च्या भाषणाला ! काय त्यांची लोकप्रियता !” (मी पु. ल. नाव फ़क्त उदाहरणादाखल घेतले आहे व ‘क्ष’ जागी ते घेतले आहे.) असे सांगितल्यावर विचारणाही साहजिकच “ही आली होती का, ती आली होती का,” असे विचारील आणि सांगणाराही अत्यंत आनंदाने सांगेल—कॉलेजमध्ये कधी न दिसणाऱ्या मुली आज दिसत होत्या…आणि त्या बोलण्याच्या आनंदात मग पु. ल. आपोआप केव्हाच मागे पडतील.
जीवनातील आपले अनुभवाचे संचित दुसऱ्यापुढे मांडावे, दुसऱ्याचे आपण पहावे, अशी जी आपली इच्छा असते तीतच माणसाचे माणूसपण आहे. परंतु जेव्हा एखादा पालक आपल्या मुलाला “मला तुझं काही ऐकायचं नाही, तुला काही सांगायचं नाही” असे म्हणतो आणि हे सांगणे व ऐकणे जेथे संपते तेथेच त्या माणसातला माणूसही स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो.परंतु माणसामाणसांचे हे प्रेम व सहानुभूती इतकी उत्कट असते की, माणसाला मरतानासुद्धा निर्जीव उशीचा आधार चालत नाही तर त्याला थरथरणाऱ्या मांडीचा आधार डोक्याखाली लागतो. पाकिस्तानमध्ये झालेल्या वादळाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या वा घरकुले विस्कळित झालेल्यांबद्दल आपणाला सहानुभूतीच वाटते. त्या वेळी आपण त्यांच्याकडे पाकिस्तानी म्हणून न बघता एक माणूस या दृष्टीनेच पाहतो.
दुर्दॆवाने ‘सहानुभूती’ हा शब्द आजकाल दुःखद घटनांच्या वेळीच वापरला जातो. वास्तविक सहानुभूती म्हणजे सह + अनुभूती = दुसऱ्याचा अनुभव आपला मानून त्याच्या अनुभवविश्वात शिरणे, ही माणसाची महान शक्ती आहे. उदाहरणार्थ, कानेटकरंचे शिवाजीवरील नाटक ! आपणांला माहीत आसते की शिवाजीचे काम करणारा माणूस हा शिवाजी नाही, तर तो रंगमंचावर काम करणारा एक नट आहे आणि तो आपल्याशी बोलत आहे—खरा शिवाजी असता तर आपणांशी बोललाही नसता. कारण आपण नालायक बनलो आहोत—परंतु आपण हे नाटक पाहण्यासाठीसुद्धा पैसे खर्चून जातो आणि विकत काय घेतो तर शिवाजीची व्यथा ! आपल्याही नकळत आपला त्यातील पात्रांशी नाट्यगृहात एक मूक संवाद चाललेला असतो. असे एखादे यंत्र निघाले आणि त्यातून हा मूक संवाद टेप झाला तर तो आपणाला स्पष्टपणे ऐकू येईल. ह्यालाच सहानुभूती —सह + अनुभूती—म्हणतात. ही शक्ती निसर्गाने फ़क्त मानवालाच दिली आहे आणि ही सहानुभूती जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपणांस आपण माणूस असल्याचा आनंद होतो आणि त्यातील प्रेक्षक हा त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तारांपैकी निगेटीव्ह तार बनलेला असतो. त्यातूनच आनंददान नि आनंदग्रहण अखंडतया सुरु असते.




