हा ‘पु. लं. च्या ‘इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४’ येथील अध्यक्षीय भाषणाचा काही भाग आहे….
इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील ‘गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी’ असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं.
नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर ‘जो जे वांछील तो ते लाहो’ च्या ठिकाणी ‘जो जे वांछील तो ते लिहो’ अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात.






