… प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाति-धर्मनिरपेक्ष अशी एकत्र येऊन करायची सामाजिक कामं कुठली? तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल? टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य एकत्र येऊन करायच्या कार्यांत साध्य होतं.' ह्मा ऐक्यासाठी विधायक कामं कुठली, याचा विचार व्हायला हवा. 'बोल होतोस की नाही भारतीय!' असं दरडावून विचारलं तर मी देखील'नाही होत जा' म्हणेन! केवळ मतपेटीशी प्रायाराधन करणाऱ्यांना लोक गटागटांनीच जगायला हवे असतात. माणसांचे कळप केले की, हाकायला सोपे पडतात! समता वगैरे ते नेते बोलतात, पण समता ही फक्त बोलायला आणि ममता मात्र निवडणुकीतल्या गठ्ठा मतांवर, हे आता लोकांनाही कळायला लागलं आहे. मी अधूनमधून आपल्या देशाविषयीच्या हायर एज्युकेशन-साठी खेड्यांत जातो. तिथल्या लोकांशी गप्पागोष्टी करतो. ती माणसं ह्मा नेत्यांविषयी काय बोलतात ते जर नेत्यांनी ऐकलं तर ह्मा देशांतल्या वर्तमानपत्रांतल्या टीकेला मानपत्र मानावं, असं त्यांना म्हणावंसं वाटेल! रेडिओ, टी. व्ही. यासारखी समर्थ प्राचारमाध्यमं दुर्दैवानं सरकारच्या ताब्यात आहेत. अंधश्रद्धा, भडक, धर्मवेड्यांना दुखवायला सरकार तयार नाही. त्यामुळे वाटेल त्या भाकडकथांचा आमची आकाशवाणी आणि दूरदर्शन यथेच्छ प्रसार करीत असते! समाजाला पथ्यकर असलेलं अप्रिय सत्य सांगायची आमच्या सरकारी प्रचारमाध्यमांची ताकद नाही. त्यामुळे आमचा रेडिओ सकाळी संपूर्ण अंधश्रद्ध आणि धार्मिक, दुपारी संततिनियमनाचा प्रसार करणारा समाजसुधारक आणि संध्याकाळी खोटे बाजारभाव सांगणारा लुच्चा व्यापारी! मी एकदा टॅमॅटोचा रेडिओवरचा भाव आमच्या भाजीवाल्या बंडोबांना सांगितला तर ते म्हणाले, 'मग साहेब त्या रेडिओवरच जा सस्ते टमाटे घ्यायला!' भारत लवकरच स्वयंपूर्ण होणार हे रेडिओवरुन ऐकतच असताना गॅलरीखाली पाहिलं की, आठ-आठ, नऊ-नऊ वर्षाची मुलं पाठीवर गोणपाट घेऊन कचरा चिवडून त्यातून कागदाचे कपटे गोळा करताना दिसत असतात! आमच्यावर जातिनिविष्ट परंपरांचा तर एवढा पगडा आहे की, लहान शतकरी, शेतमजूर, शाळामास्तर ह्मांनी गरीबच राहावं, अशी धर्माची आज्ञा आहे असंच आम्हांला वाटतं! खेड्यांतली कुटुंबच्या कुटुंबं शहरांत जगायला येऊन फूटपाथवर पसरलेली असतात, एका देशांतच नव्हे तर एका शहरात राहून सुद्धा आम्ही निरनिराळया उपग्रहांवर राहिल्यासारखे आपापले धार्मिक आणि जातीय पूर्वग्रह जोपासत राहतो.
वर्तमानकाळाकडे पाठ िफरवायची आणि स्वत:च्या प्राचीनतेचा दावा करीत देशावर आपला हक्क सांगत गायचा! आपली ही परंपरेची ओढ कुठल्या थराला जाईल हे सांगणं अवघड आहे. दिल्लीत गेल्याच वर्षी सतीच्या चालीचं पुनरुज्जीवन करायला लोक निघाले होते! ऐतिहासिक काळ हा फारच सुबत्तेचा होता आणि त्या काळी सगळयांची चरित्रं धुतल्या तांदळासारखी होती ह्मा भ्रमाची लागण तर भयंकर वाढत चाललेली आहे.
मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास 'ढोरं, गॅंवार, शूद्र, पशु, नारी, ये सब ताडनके अधिकारी' म्हणतो, म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं, खेडवळ माणसं, इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत! बायकांना नवऱ्यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे. 'उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा. हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी, मुल्ला, शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे. 'मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है?' असा सवाल कबीरानं केला आहे.


