No Comments

थोरले बाजीराव पेशवे

॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥

थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० – एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

बाळाजींच्या मृत्यूनंतर “पेशवेपदासाठी” दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले[ संदर्भ हवा ]. त्याला २ कारणे होती – १)यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.

बाजीराव शिपाई होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा “सक्सेस रेट” “१००%” आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे – “The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility”. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते – बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.

दिल्लीचा वजीर “मोहम्मद खान बंगेश” छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. “जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥” – याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने – उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने “जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा “गजांतमोक्षाचा” हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी “मस्तानी” बाजीरावास दिली[ संदर्भ हवा ]. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा यामागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास “काशीबाई” ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.

चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच “वज्रेश्वरी” देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते – निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.

स्रोत – विकिपिडिया

You might also like
Tags: bajirao mastani, bajirao peshve, itihas, maharashtra, marathi, mastani, shahu maharaj, thorale bajirao

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.