No Comments

पुलोपदेश

डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र…

पु. ल. देशपांडे,
१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे – ४.

८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर ‘लग्न’ या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. “A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding”.लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा ‘मी अव्यवस्थित आहे’, या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे ‘तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस’, असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही!) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. (‘तरुणी’ हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.) गाफीलपणाने खोकला काढलास तर ‘हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-?’ या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.

सुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले? या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे ‘राव’ या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव ‘ठाकूर’ आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे ‘बोरकर’ या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, ‘मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,’ हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, ‘बापरे! डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,’ हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे!) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही!) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.

पुढे वाचा

You might also like
Tags: marathi, marathi sahitya, pu la deshpande, pula, sahitya

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.