मराठी जगत – Marathi Website

Menu

 

सचिन तेंडुलकर

गोर्‍या सायबाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रिकेटवर गेली वीस वर्षे आपल्या असामान्य खेळाने, अनेक विक्रम करत अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी कुटुंबातून आलेल्या सचिनला क्रिकेटमध्ये करिअर करायची संधी मिळणे, घरातून तसे प्रोत्साहन मिळणे हे सचिनचे नव्हे तर आपणा सर्व भारतीय क्रिकेट रसिकांचे भाग्यच म्हणायला हवे. सचिन यांचा जन्म मुंबई येथे झाला. घरात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटविषयक अनेक गोष्टी लहानपणीच त्यांच्या कानावरून गेल्या होत्या. त्यांच्या भावाने – अजितने – त्यांच्यातील क्रिकेटचे कौशल्य ओळखून त्यांना योग्य वयात रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवण्यास पाठवले आणि त्यांच्यातील सुप्त खेळाला योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाल्यावर त्यांचा खेळ लहान वयातच अधिक परिपक्व बनत गेला. शारदाश्रम विद्यालयाचा, छोट्या चणीचा हा मुंबईकर खेळाडू लहानपणापासूनच मुंबई गाजवू लागला.

सचिन यांनी आपल्या आंतरशालेय क्रिडाजीवनापासूनच विश्वविक्रम करण्यास सुरुवात केली. १९८५-८६ ला आंतरशालेय हॅरिस शिल्ड स्पर्धेमध्ये वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मित्र विनोद कांबळी यांच्यासह ६६४ धावांचा पर्वत रचला. त्यापैकी ३२६ धावा त्यांनी स्वत: काढल्या होत्या. सचिन १५ व्या वर्षीच रणजीमध्ये पदार्पण करणारे पहिले खेळाडू होत.  सचिन हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत की ज्यांनी रणजी, दुलीप आणि इराणी या तिन्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतकी खेळी केली आहे.

सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षी – १९८९ साली – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात (कराची येथे) पदार्पण केले. सचिन यांची एकदिवसीय कारकीर्द १९८९ मध्येच पाकिस्ताविरुद्धच सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विक्रमवीराला एकदिवसीय सामन्यातील आपले १ ले शतक नोंदवण्यासाठी तब्बल ७८ सामने खेळावे लागले. १९९४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी प्रथम शतकी खेळी केली. त्यानंतर एकदिवसीय शतकांच्या विक्रमाकडे होणारा त्यांचा वेगवान प्रवास खरोखरच थक्क करून सोडणारा आहे.

आपले पहिले  तब्बल ३५ कसोटी सामने विदेशातील मैदानावर खेळणार्‍या सचिन यांनी १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकता येथे भारतीय मैदानावरील पहिली कसोटी खेळली.  या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात (चेन्नई येथे) १६५ धावा काढून मायभूमीतील आपले १ ले कसोटी शतक त्यांनी झळकावले. त्याआधी त्यांनी १९९० मध्येच इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावून धावांचा – शतकांचा रतीब घालण्यास सुरुवात केलीच होती.

सचिन यांनी आपल्या झंझावाती, वेगवान खेळीने अनेक वेळेला आपल्या संघाला पराभवापासून सावरले आहे, असंख्य वेळा विजयी केले आहे. भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनाला सर्वाधिक भिडलेली त्यांची खेळी म्हणजे ‘डेझर्ट स्टॉर्म’ म्हणून प्रसिद्ध असलेली, शारजा येथील कोकाकोला कपच्या उपान्त्य सामन्यातील खेळी होय. ऑस्ट्रेलियाच्या २८४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ४ बाद १४३ अशी झाली होती. त्याच वेळी भरीस भर म्हणून मैदानावर  तुफान वादळ सुटले होते. या वादळाला सचिन ‘वादळ’ होऊनच सामोरे गेले. सचिन यांनी ५ षटकार आणि ९ चौकार फटकावून १३१ चेंडूत १४२ धावांची खेळी करून संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले.  एवढेच नव्हे तर त्यानंतर दोन दिवसातच अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्यांच्या १३१ चेंडूतील १३४ धावांनी भारताला विजय प्राप्त झाला. ऑस्ट्रेलिया संघात मॅकग्रा, शेन वॉर्न हे जगप्रसिद्ध, अचूक गोलंदाजी करणारे गोलंदाज असताना सचिन यांनी या धावा केल्या. त्यामुळे या त्यांच्या खेळींचे महत्त्व अधोरेखित होते.

१९९४ ला न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी आघाडीचा फलंदाज म्हणून कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि जगाला एक उत्तम, आक्रमक आघाडीचा फलंदाज अनुभवण्यास मिळू लागला. सौरव गांगुली व वीरेंद्र सेहवाग या त्यांच्या जोडीदारांचा खेळ बहरण्यामध्ये सचिन यांच्या ‘समोर’ असण्याचा मोठा वाटा आहे.

कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाशी आणि खेळाशी बांधिलकी मानणारे सचिन व्यक्तिगत विक्रमापेक्षा संघाला, सांघिक कामगिरीला, देशाच्या विजयाला अधिक महत्त्व देतात. एका विश्र्वचषक स्पर्धेच्या वेळी त्यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. त्या वेळी फक्त एका सामन्यात सचिन अनुपस्थित राहिले. संघाला असणारी आपली गरज आणि खेळाबद्दलची बांधिलकी यांचा विचार करून पुढील केनियाविरुद्धच्या सामन्यात ते लगेचच सहभागी झाले. या सामन्यात त्यांनी शतकही झळकावले. तसेच त्यांना सामनावीर म्हणून पुरस्कारही मिळाला. २००३ मध्ये झालेल्या विश्र्वचषक स्पर्धेत सचिन यांनी विविध सामन्यांत मिळून ६७३ धावा काढल्या व भारताला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेत त्यांना  सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.

सचिन यांच्या प्रत्येक खेळीवर प्रतिस्पर्धी, आकडेवारी तज्ज्ञ, समालोचक, क्रीडा समीक्षक आणि जगभरातील क्रीडारसिक यांचे बारीक लक्ष असते. असंख्य लोकांची त्यांच्या धावा, बळी, त्यांचे विक्रम याबाबतची आकडेवारी तोंडपाठ असते.

– आत्तापर्यंतची २० वर्षांची कारकीर्द; अजूनही खेळण्याची क्षमता;
– आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामने मिळून सुमारे ५८० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, या सामन्यांतून एकूण सुमारे १२०० दिवस मैदानावरील चैतन्यदायी उपस्थिती, (प्रथम श्रेणीचे २५८ सामने आणखी वेगळेच),
– कसोटी व एकदिवसीय या दोन्ही प्रकारांत मिळून काढलेल्या एकूण २९००० धावा (प्रथम श्रेणीतील २१००० धावा वेगळ्याच), या दोन्ही प्रकारांत धावांच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांक;
– दोन्ही प्रकारात सर्वाधिक शतके (जानेवारी, २००९ पर्यंत एकूण ८३ शतके), (प्रथम श्रेणीतील ६८ शतके निराळीच); (स्वत:च्या एकूण कसोटी व एकदिवसीय शतकांपैकी सर्वात जास्त शतके सर्वोत्कृष्ट अशा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झळकावलेली आहेत हे विशेष महत्त्वाचे), सर्वाधिक एकदिवसीय अर्धशतके;
– सर्व विश्र्वचषक स्पर्धांचा विचार करता एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम (२००३ साल – ६७३ धावा), तसेच सर्व विश्र्वचषक स्पर्धांमध्ये मिळून एकूण १७९६ धावांसह सर्वाधिक धावांचा विक्रम, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा (५६) सामनावीर पुरस्कार व सर्वाधिक वेळा (१४) मालिकावीर पुरस्कार, एकदिवसीय सामन्यांत कॅलेंडर वर्षात १००० पेक्षा जास्त धावा काढण्याची सर्वाधिक वेळा केलेली कामगिरी…

ही विक्रमांची यादी भारतीय व मराठी माणसाला अभिमान वाटावी अशी आहे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारी आहे. या आकड्यांच्या व विक्रमांच्या जोडीला कसोटी व एकदिवसीय सामन्यांतील सचिन यांचे एकूण १९६ बळी व एकूण २२८ झेल आहेतच. त्यांच्या  ४२ एकदिवसीय शतकांच्या  सामन्यांपैकी एकूण ३० सामने भारताने जिंकलेले आहेत, तसेच त्यांनी सुमारे ५६ वेळा मिळवलेल्या सामनावीर पुरस्कारांच्या सामन्यांपैकी एकूण ५१ सामने भारताने जिंकले आहेत. यावरूनच त्यांची वैयक्तिक कामगिरी आणि भारताची विजयी कामगिरी यांमधील संबंध स्पष्ट होतात. खरे तर आता सचिन यांची महानता या सर्व

आकडेवारीच्या पलीकडे पोहोचलेली आहे.

सर डॉन ब्रॅडमन यांच्या स्वप्नातील विश्र्व संघामधील या पिढीतील एकमेव नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. एका क्रिकेटपटूसाठी यापेक्षा दुसरा बहुमान कोणता असू शकतो. कोणत्याही परिस्थितीत न डळमळता शांत आणि संयमी खेळी खेळणे हे सचिन यांचे वैशिष्ट्य. वर्तमानपत्रांतून त्यांच्याविरुद्ध काही छापून आले, कोणी काही टीका केली, प्रतिस्पर्ध्यांनी कितीही डिवचले, तरी कोणतीही प्रतिक्रिया न देणारे सचिन टीकाकारांना नेहमीच आपल्या फलंदाजीने उत्तर देतात. याचेच एक उदाहरण म्हणजे मोहाली येथील सामन्यात त्यांनी साकारलेला विश्र्वविक्रम. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या नेहमीच्या संकुचित वृत्तीने ‘सचिनला वर्ल्ड रेकॉर्ड करूच देणार नाही’, अशा वल्गना करत होते. सचिन यांनी त्या वेळी कोणतेही प्रत्युत्तर न देता शांतपणे १११ चेंडूत ८८ धावा काढल्या आणि  ब्रायन लाराचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला.

भारतीय कप्तानांना आणिबाणीच्या प्रसंगी निर्णय घेताना सचिन यांचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी पडले आहे. अत्यंत नम्र‘, निगर्वी, शांत, संयमी असा हा खेळाडू आपल्यापेक्षा कनिष्ठ असणार्‍या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळतानाही तेवढ्याच निगर्वीपणे व सहकार्याने खेळत असतो. भारतीय संघाकडून खेळणार्‍या प्रत्येक नव्या खेळाडूला सांभाळून घेणे, प्रसंगी मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे – कौतुक करणे या सचिन यांच्या कृतींतून त्यांच्या व्यक्तित्वाचा वेगळाच पैलू समोर येतो. आपल्या अनुभवाचा उपयोग सगळ्यांना व्हावा याकडे त्यांचे लक्ष असते.

हे झाले त्याच्या स्वभावगुणांविषयी. एक परिपूर्ण फलंदाज म्हणून त्यांच्याकडे  स्वत:ची एक खास शैली आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर कट हे त्यांचे विशेष प्रेक्षणीय फटके होत. शिवाय उपखंडातील फलंदाजांमध्ये ‘ऑन साईडला’ फटकेबाजी करण्याचे तंत्र असते, ते त्यांच्याकडे विशेष कौशल्यासह आहेच. तंत्रशुद्धता आणि आक्रमण यांचे अतिशय सुरेख संतुलन हे सचिन यांचे प्रमुख वैशिष्ट्य होय. यांच्या जोडीला परिस्थितीचे आकलन, संयम, कल्पकता, सर्जनशीलता… इत्यादी गुण त्यांच्याकडे आहेतच. त्यांच्या कल्पकतेचे व सर्जनशीलतेचे उदाहरण म्हणजे पॅडल स्वीपचा फटका आणि शोएब अखतर, ब्रेट ली, मायकेल जॉन्सन या जलदगती गोलंदाजांनी उसळता चेंडू (बाऊन्सर) टाकल्यास बॅट उंचावून, चेंडूच्या वेगाचा फायदा घेत, थर्डमॅनच्या डोक्यावरून ठोकलेला षटकार होय. या फटक्यांमुळे अनेक जगप्रसिद्ध गोलंदाज निष्प्रभ व निरुत्तर ठरत आहेत. खेळपट्टीचा पटकन येणारा अंदाज, गोलंदाजाच्या हाताच्या हालचालीवरून चेंडूचा क्षणार्धात अंदाज घेण्याची क्षमता, उत्तम पदलालित्य, भेदक नजर, प्रतिस्पर्धी-प्रेक्षक-एकूण परिस्थिती यांचा दबाव पेलण्याची ताकद… आदी सर्व गुणधर्म व कौशल्यांमुळेच सचिन हे क्रिकेटविश्र्वातील सार्वकालिक सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटुंपैकी एक ठरतात. मैदानावर १००% एकाग्रता व उत्तम खेळाचे सातत्य आणि अविश्वसनीय शारीरिक क्षमता (फिटनेस) या त्यांच्या आणखी काही वैशिष्ट्यांमुळेच ते एक आदर्श मानले जातात.

सचिन तेंडुलकर हे जगातील काही अष्टपैलू खेळाडूंमध्येही गणले जातात. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच त्यांचे गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील कौशल्यही वाखणण्याजोगे आहे. कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर ते दोन्ही बाजूंना सहजतेने चेंडू वळवून गोलंदाजी करू शकतात. भल्याभल्या फलंदाजांचा गोंधळ उडविण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजीत आहे. ज्या वेळी संघाला एखादा बळी अत्यावश्यक असतो, त्या वेळी सचिन यांच्याकडे अपेक्षेने गोलंदाजी सोपवली जाते व ते त्यात यशस्वी होतात. या सर्व गुणांमुळेच सचिन यांच्याकडे नेहमीच संघाचा ‘आधारस्तंभ’ म्हणून पाहिले जाते. त्यांचे मैदानावर केवळ ‘असणे ’च भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढवते.

जगातील जवळजवळ सर्व मैदानांवर (सुमारे ९०) आपल्या सर्वोत्तम व परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन करणार्‍या सचिन तेंडुलकर यांना अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुमारे १० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंत स्थान मिळविण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. विस्डेनचा क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कार, भारतातील पद्मविभूषण, पद्मश्री, अर्जुन व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार…. ही बहुमानांची यादीही त्यांच्या विक्रमांइतकीच मोठी आहे. पण सर डॉन ब्रॅडमन यांच्या पत्नीने, ‘मला सचिनच्या खेळात ब्रॅडमन यांचा भास होतो’, अशी दिलेली प्रतिक्रिया आणि स्वत: सर ब्रॅडमन यांनी प्रत्यक्ष भेटीत केलेले कौतुक हाच सचिन यांच्यासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे असे म्हणता येईल.

गेली २० वर्षे क्रिकेट विश्वात सातत्याने आपला ठसा उमटवणे ही काही साधी गोष्ट नव्हे. तसेच करोडो भारतीय क्रिडा रसिकांच्या अपेक्षांचे ओझे पेलत सातत्यपूर्ण कामगिरी करणे म्हणजे एक अग्निदिव्यच! अनेक विक्रम करताना, अनेक पुरस्कार भूषवताना आणि स्लेजिंगचा जमाना असताना आपल्या विनम्र‘ वागणुकीने भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये सचिन यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे. सचिन तेंडुलकर हे आता केवळ एक क्रिकेट खेळाडू राहिले नसून ते भारताचे ‘क्रीडा राजदूत’ मानले जातात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते एक ‘सुप्रसिद्ध क्रीडा आयकॉन (प्रतिमान)’ बनले आहेत. भारताला विजयाची सवय लावणार्‍या सचिन यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

दृष्टिक्षेपात सचिन तेंडुलकर यांची कारकीर्द – (नोव्हेंबर, २०१५ पर्यंत)

Batting and fielding averages
Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St
Tests 200 329 33 15921 248* 53.78 51 68 69 115 0
ODIs 463 452 41 18426 200* 44.83 21367 86.23 49 96 2016 195 140 0
T20Is 1 1 0 10 10 10.00 12 83.33 0 0 2 0 1 0
First-class 310 490 51 25396 248* 57.84 81 116 186 0
List A 551 538 55 21999 200* 45.54 60 114 175 0
Twenty20 96 96 11 2797 100* 32.90 2310 121.08 1 16 359 38 28 0
Bowling averages
Mat Inns Balls Runs Wkts BBI BBM Ave Econ SR 4w 5w 10
Tests 200 145 4240 2492 46 3/10 3/14 54.17 3.52 92.1 0 0 0
ODIs 463 270 8054 6850 154 5/32 5/32 44.48 5.10 52.2 4 2 0
T20Is 1 1 15 12 1 1/12 1/12 12.00 4.80 15.0 0 0 0
First-class 310 7605 4384 71 3/10 61.74 3.45 107.1 0 0
List A 551 10230 8478 201 5/32 5/32 42.17 4.97 50.8 4 2 0
Twenty20 96 8 93 123 2 1/12 1/12 61.50 7.93 46.5 0 0 0

(*प्रत्येक १०० चेंडूंमागे धावांची संख्या)

Categories:   व्यक्ती आणि वल्ली

Comments

  • Posted: February 14, 2016 01:50

    mahadeo

    nice post
  • Posted: July 15, 2017 13:11

    ज्ञानेश्वर

    महान हा शब्द म्हणजेच सचिन तेंडुलकर