मराठी जगत – Marathi Website

Menu

मुंबई

गेट वे ऑफ इंडिया: भारताचे हे प्रवेशद्वार १९११ मध्ये राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आले. हे बांधकाम सोळाव्या शतकातील गुजराती व इस्लामिक शैलीचे आहे असे मानले जाते. याची रचना जॉर्ज विटेट याने केली होती. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्र्वारूढ पुतळा पुढील काळात उभारण्यात आला आहे. येथे एलिफंटा बेट व बंदराच्या आसपासच्या समुद्रकिनार्यांवर जाण्यासाठी बोट सेवादेखील उपलब्ध आहे. याच्या मागील बाजूस जुन्या व नवीन ताजमहाल हॉटेलची इमारत आहे. या ठिकाणाचे परदेशी पर्यटकांनाही आकर्षण आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस: हे रेल्वे स्थानक ब्रिटिशांनी १८८८ मध्ये बांधले. याची रचना फेडरिक विल्यम्स स्टीव्हन्स या वास्तुशास्त्रकाराने केली. याचे बांधकाम पूर्ण होण्यास दहा वर्षे लागली. ही जगातील उत्तम वास्तुंपैकी एक मानली जाते. टर्मिनसच्या छतावर राणी व्हिक्टोरियाचा पुतळा असून राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीच्या स्मरणार्थ याचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे ठेवण्यात आले होते. ते बदलून अलीकडेच छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले आहे. मुंबईमध्ये येण्यासाठी तसेच बाहेर जाण्यासाठी; उपनगरीय तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांकरिता हे फार महत्त्वाचे स्थानक आहे. हे भारतातील सर्वांत व्यस्त स्थानकांपैकी एक असून येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.

हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन): संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेल्या आंदोलकांचे स्मारक येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. ग्रीक देवी फ्लोरा हिच्या नावावरून या परिसराला फ्लोरा फाउंटन असे नाव पडले होते.

मरीन ड्राईव्ह: रस्त्यावरील दिव्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे हा परिसर “क्वीन्स नेकलेस” म्हणून ओळखला जातो. येथील चौपाटी, अर्ध वर्तुळाकार सागरी किनारा व किनार्यालगतचा रस्ता पर्यटकांचे आकर्षण आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिर: गणपतीचे हे मंदिर प्रभादेवी परिसरात आहे. हे मंदिर अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे हिचे एक वैशिष्ट्य मानण्यात येते. अलीकडच्या काळात भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान: १०४ चौ.कि.मी.वर पसरलेले हे उद्यान बोरिवली येथील कृष्णगिरीच्या परिसरात आहे. कृष्णगिरी उपवनाच्या टेकडीवर महात्मा गांधी स्मृती मंदिर आहे. पूर्वी हे उद्यान बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जायचे. या उद्यानात घनदाट जंगलात वाहते झरे, बागडणारे पशू-पक्षी पाहण्यास मिळतात. या उद्यानातून सफर घडवणारी छोटी आगगाडीही पर्यटकांना आकर्षित करते.

Categories:   माझा महाराष्ट्र

Comments