मराठी जगत – Marathi Website

Menu

संत ज्ञानेश्वर

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु | सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्ति दासु | अवधारिजो जी ||२||
हें शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष |
तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३||
स्मृति तेचि अवयव | देखा अंगिकभाव |
तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा ||४||

संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५समाधी : १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

बालपण
संत ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत – रुक्मिणीबाई या कुळकर्णी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्ती तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती.

त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. तत्कालीन समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. समाजाकडून होणारा त्रास सहन न झाल्याने विठ्ठलपंत आणि रुक्मीणीबाई यांनी देहत्याग केला.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या.

कार्य
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म – वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
भावार्थदीपिका – ज्ञानेश्वरी- या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
शेकडो मराठी अभंग (उदा. ज्ञानेश्वर हरिपाठ)
चांगदेव पासष्टी
अमृतानुभव
संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.

चमत्कार
संत ज्ञानेश्वरांनी आपले आयुष्य वारकरी संप्रदायाचा प्रसारासाठी वेचले. आपल्या जठरातील अग्नी प्रज्वलित करून पाठीवर मांडे भाजणे. रेड्याच्या तोंडातून वेद म्हणवून घेणे, चांगदेव भेटीसाठी जाताना भिंतीला चालावयास लावणे. हे त्यातील उल्लेखनीय चमत्कार.

Categories:   इतिहास, माझा महाराष्ट्र

Comments