मराठी जगत – Marathi Website

Menu

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावऱ्हल्या रे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वहादनं

मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !

मन चपय चपय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियांत !
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत !

देवा आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं !

रचना – संत बहिणाबाई
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – मानिनी (१९६१)

Categories:   मनोरंजन

Comments