मराठी जगत – Marathi Website

Menu

चांद मातला, मातला

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू ?

अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू

गोड गारव्याचा मारा, देह शिरशिरे सारा
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू

याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी
घाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?

चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू

गीत – वसंत बापट
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – उंबरठा (१९८१)

Categories:   मनोरंजन

Comments