मराठी जगत – Marathi Website

Menu

बुगडि माझी सांडलि ग

बुगडि माझी, सांडलि ग,
जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला
चुगलि नगा, सांगू ग,
माझ्या म्हताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला !

माझ्या शेजारी तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधि खुणेने जवळ बाहतो
कधि नाही ते भुलले ग बाई,
त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला !

आज अचानक घरी तो आला
पैरण, फेटा नि पाठीस शेमला
किती गोड तो मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई,
त्याला शेजाऱ्याला, माझ्या शेजाऱ्याला !

घरात नव्हते तेव्हा बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई-तोबा तोबा !
वितळू लागे ग बाई लोणी,
बघता निखाऱ्याला, बघता निखाऱ्याला !

त्याने आणिली अपुली गाडी
तयार जुंपुनि खिलार जोडी
मीहि ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावाणी जोडीने ग गेलो,
आम्ही बाजाराला, आम्ही बाजाराला !

येण्याआधी बाबा परतून
पोचणार मी घरात जाउन
मग पुसतील काना पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई,
त्याला बिचाऱ्याला, त्याला बिचाऱ्याला !

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – राम कदम
स्वर – आशा भोसले
चित्रपट – सांगते ऐका (१९५९)

Categories:   मनोरंजन

Comments